जन्मदाते फिरले अन् सासरचेही दुरावले ! खून झालेल्या पूजाचे पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) करमाड परिसरातील पेट्रोल पंपावर घटस्फोटीत पत्नीचा तिच्याच दुसऱ्या पतीकडून चाकूचे वार करत खून करण्यात आला होता. त्याच मृत पूजा सुदाम गावंडे (२७, रा. चित्तेपिंपळगाव, ह. मु, करमाड) वर अंत्यसंस्कार करण्यास सासर आणि माहेरच्या नातेवाईकांनी नकार दिल्याने, शेवटी पोलिसांनी तिच्या दोन नातेवाईकांच्या उपस्थितीत बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. त्यामुळे पूजाच्या मृत्यूनंतर रक्ताचे नाते असलेल्यांकडून अंत्यसंस्काराचे भाग्यही तिला लाभले नाही.
मृत पूजा गावंडे हिचा दुसरा विवाह ५ नोव्हेंबर २०२५ रोजी आळंदी येथील आर्य समाजभवनात सत्यम गावंडे याच्यासोबत झाला होता. तो नेहमी तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता, तसेच तिला पेट्रोल पंपावर काम करण्यासाठी त्याचा विरोध होता. या छळाला कंटाळून पूजाने १४ फेब्रुवारी २०२६ रोजी बॉण्ड पेपरवर करारनामा करून त्याला घटस्फोट दिला होता, याचा राग मनात धरून सत्यमने गुरुवारी (दि. ९) दुपारी तिचा गळा चिरून निघृण खून केला.
पहिल्या नवन्याने जीवन संपवले; दूसरे लग्न केले; पण शेवट झाला भयंकर
करमाड येथे एका पेट्रोल पंपावर काम करून दोन मुलांसह आपली उपजीविका चालविणाऱ्या पूजा सुदाम गावंडे (२७, रा. चित्तेपिंपळगाव, करमाड) या महिलेला संपवले. ती काम करत असलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन धारदार चाकूने पूजा सुदाम गावंडेचा गळा चिरून तिला निघृणपणे सपंवले. ही घटना करमाडच्या गणपती मंदिराजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर गुरुवारी (दि. ९) दुपारी १२.३० वाजता घडली आहे. सत्यम रावसाहेब गावंडे (२८, रा. चित्ते पिंपळगाव) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला घटनेनंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवध्या दोन तासात अटक केली.
पहिल्या पतीची आत्महत्या; नंतर दुसरे लग्न केले अन्...
पूजाचे पहिले लग्न चित्ते पिंपळगाव येथील सुदाम गावंडे यांच्यासोबत २०१७ मध्ये झाले होते. घरगुती कारणामुळे सुदाम यांनी १२ जानेवारी २०२३ रोजी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. त्यानंतर पूजाने १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सत्यम रावसाहेब गावंडेसोबत देवाची आळंदी येथे आर्य समाज संस्थेत विवाह केला. पूजाला पहिल्या पतीपासून मुलगा व मुलगी आहे. लग्न झाल्यानंतर पूजा ही काही दिवस कुंभेफळ येथे राहत होती. परंतु, दीड महिन्यापूर्वी सत्यम याच्यासोबत काही वाद झाल्यामुळे ती करमाडला राहण्यासाठी आली होती.
पेट्रोल पंपावर नेमकं काय घडलं?
दोघांचे वाद होऊ लागल्याने पुजा काही दिवसांपासून करमाडला राहत होती. गेल्या दीड महिन्यापासून ती आपल्या मुलांसाठी करमाडच्या पेट्रोल पंपावर नोकरी करत होती. ती गुरुवार सकाळी ९.३० वा. पेट्रोल पंपावर आली. पंपावर ड्यूटी सुरू असताना दुपारच्या सुमारास अचानक तिचा पती दुचाकीवरून पंपावर आला. पंपाच्या स्टैंडजवळ त्याने दुचाकी उभी करून पत्नी पूजाला पकडले. पूजाने त्याच्या हातातून सुटून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्यमने गाडीवरून उतरून मागून जाऊन तिला पकडले. पूजाचा गळा पकडून पाठीत चाकूने वार करून तिला जमिनीवर पाडले. यानंतर धारदार चाकूने गळा
चिरला. आवाज ऐकून पेट्रोल पंपाच्या मालकाने सत्यमला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर तो घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाला.
ही सर्व थरारक घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपी सत्यम पूजाची हत्या करण्यासाठी सकाळी पेट्रोलपंपावर आला होता. परंतु, पंपावर गर्दी असल्याने तो परत गेल्याची माहिती आहे. दुपारी पंपावर वाहनांची गर्दी नसताना तो पुन्हा आला आणि त्याने अत्यंत कुरतेने पत्नीला संपवले. या घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पूजाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी पूजाला तपासून मृत घोषित केले.